माफ करणे म्हणजे विसरणे आहे का?
माफ करणे म्हणजे विसरणे आहे का? विसरण्याच्या खूप छान छटा आहेत. लहानपणी आपण छान विसरत असतो. काल संध्याकाळी झालेले भांडण आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जवळजवळ विसरून गेलेलो असतो. एखादी गोष्ट सोडून देणे आपल्याला तेव्हा सहज अवगत असते. कारण आपण सर्वच बाबतीत कोणावर ना कोणावर अवलंबून असतो. ही अवस्था कदाचित छान असते; त्यामुळे आपला त्रासही खूप कमी असतो. जसे जसे आपण मोठे होतो, तसे आपले परावलंबित्व कमी झाले आहे असे आपल्याला वाटू लागते. आणि पन्नाशीनंतर कुठेतरी काळ पुन्हा एक वळण घेतो. आपण हळूहळू पुन्हा परावलंबी होऊ लागतो. पण आता आपण लहानपणापेक्षा जास्त सावध आणि सुजाण असतो. त्याचबरोबर अनेक गोष्टींमध्ये ग्रस्त आणि लिप्तही झालेलो असतो. त्यामुळे गोष्टी सहज सुटत नाहीत. आपण त्यांना घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सवयी, आवडीनिवडी, दिसणे, बोलणे, खाणे-पिणे, आपला दिनक्रम—सगळेच महत्त्वाचे वाटायला लागते. आणि हळूहळू आपण म्हणजेच आपल्या सवयी, आपले दिसणे, आपले बोलणे, आपले खाणे-पिणे आणि आपला दिनक्रम असे काहीसे होऊन जाते. काही काळ लोक आपले हे वागणे सहनही करतात. पण काळ बदलत असतो. तो पुढे जात असतो. आता आपली मुले...